२१ जून रोजी झालेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मुक्ताईनगर शाखेची चमकदार कामगिरी
मुक्ताईनगर : इंग्लिश झोन अकॅडमीतर्फे दि. २१ जून २०२६ रोजी आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मुक्ताईनगर शाखेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत प्रथम, तृतीय तसेच सर्वोत्कृष्ट वक्ता पुरस्कार पटकावले. समिक्षा गणेश हिने प्रथम क्रमांक, निहारिका जाधव हिने तृतीय क्रमांक मिळविला, तर हर्षानी चौहान व प्रिया नाफडे यांना सर्वोत्कृष्ट वक्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेत मुक्ताईनगर, फैजपूर, सावदा, वरणगाव आणि भालोद या पाच शाखांमधील प्रत्येकी दहा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. एकूण ५० विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर प्रभावी भाषणे सादर करून आपल्या वक्तृत्व कौशल्याचे दर्शन घडविले.
स्पर्धेच्या प्रमुख पाहुण्या डॉ. प्रतिभा ढाके (जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "वक्तृत्व ही केवळ बोलण्याची कला नसून व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, ज्ञान आणि संवादकौशल्य यांच्या जोरावर जीवनात मोठी प्रगती साधावी."
स्पर्धेचे परीक्षक प्राचार्य सोनवणे (एम. एम. नरखेडे विद्यालय, रुईखेडा) यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करताना म्हटले की, "ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी दाखवलेला आत्मविश्वास आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व प्रेरणादायी आहे. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास हे विद्यार्थी भविष्यात मोठे यश मिळवू शकतात."
स्पर्धेत समिक्षा गणेश (मुक्ताईनगर) हिने प्रथम क्रमांक, धनश्री वाघमारे (फैजपूर) हिने द्वितीय क्रमांक, तर निहारिका जाधव (मुक्ताईनगर) हिने तृतीय क्रमांक मिळविला. हर्षानी चौहान व प्रिया नाफडे यांना सर्वोत्कृष्ट वक्ता पुरस्काराने गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय धुंदे व हर्षल भवरे यांनी केले. सर्व शाखांच्या संचालकांचे मार्गदर्शन तसेच शिक्षकांच्या सहकार्यामुळे स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाचे उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले.
या यशाबद्दल सर्व विजेते, सहभागी विद्यार्थी, शिक्षक, पालक व संचालक मंडळाचे अभिनंदन करण्यात आले.